Friday, 20 May 2011

कधी येते का ग माझी आठवण....


आठवणी त्या गेल्या वाहून का तुझ्या अश्रू मधून....
कि आठवतो पुसट पुसट चेहरा माझा अजून....
कधी कधी येते का ग माझी आठवण....
आठवतात का तुला कधी ते क्षण....

घालवले जे सोबत आपण त्या क्षणांची ....
आणि घालवू नाही शकलो जे क्षण सोबत.....
कधी कधी येते का ग माझी आठवण....
आठवतात का तुला कधी ते क्षण....

पुढ्यात ताट आणि मनात येतो का माझा विचार....
पुन्हा मागे नाही असं म्हणत म्हणतेस का एखादा सुविचार.... 
कधी कधी येते का ग माझी आठवण....
आठवतात का तुला कधी ते क्षण....

विचारात लक्ष न लागे कधी त्या जेवणावर....
जेवताना कधी तो घास अडतो का ओठांवर....
कधी कधी येते का ग माझी आठवण....
आठवतात का तुला कधी ते क्षण....

डोळ्यातून वाहते का ग कधी अश्रूंची धार....
पण अडवून पुन्हा करतेस माझाच विचार....
कधी कधी येते का ग माझी आठवण....
आठवतात का तुला कधी ते क्षण....

आठवणीत फिरता कधी थांबतेस का त्या जागी येऊन....
ज्या ठिकाणी कधी भेटायचो आपण लपून छपून....
कधी कधी येते का ग माझी आठवण....
आठवतात का तुला कधी ते क्षण....

कधी प्रेम तर कधी भांडण आपली अधून मधून....
तुझी नजर चहू ओर कोणीतरी बघेल म्हणून....
कधी कधी येते का ग माझी आठवण....
आठवतात का तुला कधी ते क्षण....

खरंच सांग...
की विसरलीस सारं आणि हरवलं तुझ्यातलं माझं मन....

असं जगता आलं पाहिजे

जगण्यातला आनंद लुटता आला पाहिजे,
त्यासाठी मनभरून जगले पाहिजे....


कोणाचीही चिंता न करता आपलाच आनंद शोधता आला पाहिजे,
कोणी स्वार्थी म्हंटल तर काय झालं,
आपलं आयुष्य शेवटी आपल्यालाच सजवता आलं पाहिजे....



कोणाची साथ मिळेल मग सजवता येईल असा म्हणण्यापेक्षा,
कोणालाही आपल्या आयुष्यात येण्याचा मोह होईल असे आपण बनले पाहिजे.....



नेहमीच हसले पाहिजे पण कधीतरी रडलेहि पाहिजे,
या आयुष्यात रंग भरण्यासाठी खोड्याही केल्या पाहिजेत....



कोणाला तरी मदत केली पाहिजे, कधीतरी कोणाला फसवलंही पाहिजे,
या जगातून जाण्याअगोदर जगातील साऱ्या गोष्टी आणि क्षण अनुभवले पाहिजे.....



जास्त काही नाही पण या जगात जन्म घेतल्याचे सार्थक झाले पाहिजे,
स्वर्ग नाही भेटला तरी खंत नाही, पण कमीतकमी नर्क टाळता आला पाहिजे......
                                                                                              

Thursday, 19 May 2011

पहिली भेट


विचारलं तिला,
होकार मिळाला,
पहिलाच खेळ,
ठरली वेळ,
ती वेळ पहिली होती....


कसं भेटायचं,
काय करायचं, 
किती बोलायचं, 
काय बोलायचं,
सगळं ठरवलं होतं.. 
ती वेळ पहिली होती.... 

ती कशी दिसेल,
काय बोलेल,
काय विचारेल, 
काय सांगेल,
सगळ्या कल्पना होत्या, 
ती वेळ पहिली होती....

अखेर गेलो,
हिंमत केली,
मी होतो,
अन तीही होती,

दोघांची अवस्था सारखीच होती,
कारण ती भेट पहिली होती....

माझीही कोणीतरी प्रिया असावी.....


लाजून तुझ्यावर प्रेम करते असे म्हणावी,
गळ्यात-गळे घालून फिरण्यापेक्षा,
स्वच्छंदी जगणारी ती परी असावी,
खरंच माझीही कोणीतरी प्रिया असावी......

आठवणीत माझ्या विरून जावी,
सारखी तिचं ती स्वप्नी यावी,
पापा गोड देऊन मज झोपेतून उठवावी, 
खरंच माझीही कोणीतरी प्रिया असावी......

गोड हसावी, लटके रुसावी,
निराळीच तिची अदा असावी,
जणू जीवनात माझ्या एक फुलबाग फुलावी,
खरंच माझीही कोणी प्रिया असावी......

बागेत मला भेटाया यावी, 
मला पाहुनी मंद हसावी,
या भेटीने ती स्वैर उजळावी,
खरंच माझीही कोणीतरी प्रिया असावी......

सर पावसाची इतक्यात यावी,
दूर बसलेली मज-जवळ सरकावी,
हळूच मिठीत विसावून जावी,
खरंच माझीही कोणीतरी प्रिया असावी.....

ऋतू अचानक पालटून जावा,
आसमंतात शिरशिरी  उठावी,
जणू प्रेमाचीच ती सर असावी,
सोबत मज देत तीही कोणतासा मंत्र स्मरावी 
खरंच अशी माझीही कोणी प्रिया असावी......